हनुमान मंदिरात मनोज जरांगे यांचा फोटो

बीड : जिल्ह्यातील भाटुंबा येथील ऐतिहासिक व श्रद्धेचे केंद्र असलेल्या हनुमान मंदिरात अलीकडे समाज आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचा फोटो लावण्यात आला. या कृतीमुळे गावात व परिसरात मोठा वाद निर्माण झाला असून इतर समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचे स्पष्ट होत आहे.धार्मिक स्थळ म्हणजे आस्था, श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक मानले जाते. अशा पवित्र ठिकाणी कोणत्याही व्यक्तीचा, आंदोलन नेत्याचा किंवा राजकीय नेत्याचा फोटो लावणे अनुचित असल्याचे नागरिकांचे ठाम मत आहे. देवस्थान हे सर्व समाजाचे असल्याने तेथे केवळ देव-देवतांचीच पूजा व्हावी, इतर कोणत्याही स्वरूपातील व्यक्तीपूजेला जागा नसावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.या प्रकरणी सर्वात मोठा प्रश्न ग्रामपंचायतीच्या भूमिकेवरच निर्माण झाला आहे. इतकी मोठी घटना गावात घडूनही ग्रामपंचायतीने यावर कोणताही प्रतिबंध घातला नाही. “ग्रामपंचायतीने वेळीच पावले उचलली असती, तर श्रद्धास्थानाच्या अपमानाचा प्रश्नच निर्माण झाला नसता,” असा रोष ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.स्थानिक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत सांगितले की, “मंदिर हे व्यक्तींच्या प्रचाराचे ठिकाण नाही. इथे देवच हवेत, माणसांचे फोटो नव्हेत. अशा कृतींमुळे समाजात फूट पडते आणि श्रद्धेचा अपमान होतो.”सध्या या घटनेमुळे गावात चर्चेला उधाण आले असून, धार्मिक ठिकाणांचा वापर वैयक्तिक गौरवासाठी किंवा आंदोलनाच्या प्रचारासाठी करू नये, अशी सर्वसामान्यांची मागणी होत आहे.